मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने मलिक यांना अटक केली. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यांनी हात उंचावून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अभिवादनही केले. आपण पुढच्या लढाईसाठी तयार आहोत, असेच मलिक यांनी आपल्या देहबोलीतून दाखवून दिले आहे.
जुन्या मालमत्तांच्या व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीकडून आज सकाळी सात वाजेपासून चौकशी सुरू होती. आज बुधवारी भल्या पहाटेच ईडीचे पथक मलिक यांच्या घरी धडकले होते आणि मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी करायची असल्याचे सांगत ते त्यांना घेऊन ईडीच्या कार्यालयात आले होते. तेव्हापासून मलिक यांची चौकशी सुरू होती.
आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने मलिकांना अटक केली. अटकेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी ईडीचे अधिकारी मलिकांना घेऊन कार्यालयाबाहेर पडले. तेव्हा मलिकांच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्यांनी हसत हसतच कार्यालयाबाहेर जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. लढेंगे और जितेंगे असे मलिक प्रसार माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करताना म्हणाले. जे. जे. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
आपण झुकणार नाही, असे नवाब मलिक यांनी आधीच जाहीर केले होते. त्याआधी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहीत आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू, असा इशारा मलिक यांनी दिला होता. त्यानंतर ईडीने आज सकाळीच मलिक यांच्यावर कारवाई केली.