गेल्या वेळी लाड यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात बंडखोरी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
पुणे: विधानपरिषदेसाठी होऊ घातलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हालचाली वेगाने घडत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील नेते अरूण लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळच्या निवडणुकीत लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवून चंद्रकांत पाटील यांचा विजय सुकर केला होता. आता लाड यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, भाजपाने तुल्यबळ नसलेल्या संग्राम देशमुख यांचे नाव फायनल केल्याचे समजते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटील यानिमित्ताने मागील निवडणुकीत झालेल्या लाभाची उतराई करू इच्छितात अशी चर्चा आता रंगू लागली आहे. असे असले तरी दोन्ही उमेदवारांच्या नावावरुन उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
गेल्या पदवीधर निवडणुकीत अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार सारंग पाटील यांचा निसटता पराभव झाला होता. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करणाऱ्या लाड यांची उमेदवारी निष्ठावंतांवर अन्याय करणारी आहे असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळातून उमटत असून तसे सूरही सोशल माध्यमातून उमटत आहेत. याशिवाय शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे हे देखील निवडणूक लढविण्यावर ठाम असून त्यांची उमेदवारी देखील महत्वाची ठरणार आहे.
दुसरीकडे भाजपाकडून पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. परंतु त्यांच्याऐवजी पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऐनवेळी संग्राम देशमुख यांचे नाव पुढे केले आहे. दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. या निवडणुकीसाठी संघाकडून राजेश पांडे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. याशिवाय भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी देखील इच्छूक होत्या. परंतु पुण्यातील एकही नाव भाजपाने पुढे न केल्यामुळे मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.