मुंबई: राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने नवे माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात असून ते पूर्वीच्या धोरणापेक्षा अधिक गतिशील असेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला.
उद्योग विभागाच्यावतीने माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात असून त्याची रुपरेषा ठरविण्यासाठी आज आयटी क्षेत्रातील जाणकारांसोबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेला अधिक वाव आहे. नव्या आयटी धोरणात याचा समावेश करावा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, भागांत मोठ्या प्रमाणात आयटी उद्योग विस्तारला आहे. येत्या काळात राज्याच्या ग्रामीण भागांत या क्षेत्राचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. नव्या बदलांसह रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धनांवर अधिक भर दिला जाईल, असे श्री. देसाई म्हणाले.
नव्या आयटी धोरणाबाबत नॅस्कॉम, सीआयआय़ व आयटी क्षेत्रातील आघाडीवरील कंपन्यांमधील २८ हून अधिक जाणकारांनी सूचना केल्या. या सर्व सूचनांचा साकल्याने विचार करून नवे माहिती तंत्रज्ञान धोरण आखण्यात येईल, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.