लातूर: सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेत असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रारूप हे निश्चितच स्वागतार्ह असले, तरीही अंमलबजावणीच्या दृष्टीने आव्हानात्मक व अनेक बाबतीत प्रत्यक्षात राबवण्यासाठी उपलब्ध स्रोतांचा विचार करता प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक व साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी केले.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रारुपातील तरतुदींच्या संदर्भात मार्गदर्शन व चर्चेस्तव सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान (पानगाव ता. रेणापूर जि.लातूर) या संस्थेतर्फे, आभासी परिसंवादाचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी ‘झूम’द्वारे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणातील प्रस्तावित तरतुदी या तत्वत: निश्चितच आमूलाग्र बदलासाठी पूरक आहेत. मात्र, तळागाळातील शैक्षणिक अवस्था पाहता त्या अपुऱ्या व अवाजवी असल्याची टीका करताना, बहुविध शाखांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सज्ज शाळा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, ग्रामीण भागातील संसाधनक्षमता आदी बाबींची पूर्तता कशी करणार याचा त्यात स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक होते, असे ते म्हणाले.
विविध विचारप्रणालींच्या सरकारांनी आपापल्या परीने वेळोवेळी आखलेले शैक्षणिक धोरण त्या त्या परिस्थितीत स्वागतार्ह व योग्यच होते, तरीही अनेकवेळा जुन्याच बाबी नवीन धोरणात अंतर्भूत केल्या जातात, तेव्हा पहिल्या धोरणांतील उद्दिष्टांची पूर्तता झालेली नाही हे लक्षात येते, ही चिंता व चिंतनाची बाब याही वेळी लक्षात येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब गाठाळ होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भाऊ गावंडे, डॉ. सुरेश खुर्साळे अशा मान्यवरांसह महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांचे संचालक, शिक्षक, अभ्यासक, पालक, व सुजाण नागरिकांनी चर्चेत भाग घेत चांगला प्रतिसाद दिला. या आयोजनासाठी दत्ता कुलकर्णी, वैजनाथ चामले, बाळासाहेब यादव, संजय अयाचित यांनी परिश्रम घेतले.
दुसरे सत्र उद्या सोमवारी:
या चर्चेच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले असून इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा. यापुढे अशी अनेक चर्चासत्रे प्रतिष्ठान आयोजित करणार असून, या विचारमंथनात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजक प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, प्रा. मनोहर कबाडे व पुरुषोत्तम भांगे यांनी केले आहे. त्यासाठी सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या https://www.skspratishthan.com
या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असून याशिवाय ८३२९० ३२१६४ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.