ज्येष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे यांचे आवाहन; १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन
अंबाजोगाई: बेगडी दुनियेतून वास्तव दुनियेत येण्यासाठी अनिवासी अंबाजोगाईकरांनी एकदा अंबाजोगाई ला यायलाच हवे असे आवाहन अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप घारे यांनी केले. तसेच त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला हवे. मात्र, या स्वातंत्र्याला मर्यादा येत चालल्या आहेत अशी खंतही व्यक्त केली.
१० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन येथील टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयात सुर्यकांत गरुड व्यासपीठावर करण्यात आले. यावेळी विचारपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य, त्यांच्या सुविद्दपत्नी सौ. उर्मिला वैद्य, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे, सचिव गोरख शेंद्रे,मावळते संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीहरी नागरगोजे, सत्कार मूर्ती अमर हबीब, प्रा. डॉ. देविदास खोडेवाड, मसाप कार्यकारिणीचे सदस्य डॉ. राहूल धाकडे, अमृत महाजन, प्रा. कावळे, प्रा. डॉ. शैलजा बरुरे, रेखा देशमुख, निशा चौसाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दिलीप घारे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात अंबाजोगाई शहरात घालवलेल्या बालपणाच्या आठवणीपासून नाट्यक्षेत्राकडे ओढल्या गेल्यापर्यंतच्या प्रवासाचा धांडोळा घेतला. ज्या परिसरात त्यांनी आपले बालपण घालवले त्या खडकपुरा, देशपांडे गल्लीतील प्रवासासह आईकडून मिळालेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा हा आपल्या जीवनातील वाटचालीत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आपण शिक्षण घेण्यासाठी गेलो आणि तेथून खऱ्याअर्थाने आपला रंगमंचावरील प्रवास सुरू झाला असे त्यांनी सांगितले. यांची सर्व प्रेरणा प्रा. डॉ. केशव देशपांडे यांनी आपल्याला दिली असा आवर्जून उल्लेख ही त्यांनी केला. प्राणीशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी घेवून नाट्यशास्त्रात अध्यापन करणारा एकमेव प्राध्यापक असल्याचे ही त्यांनी सांगून बेगडी दुनियेतून वास्तव्याच्या दुनियेत येण्यासाठी अनिवासी अंबाजोगाईकरांनी एकदा अंबाजोगाई ला यायलाच हवं असं त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार लेखक अमर हबीब यांना सौ. मंदा देशमुख स्मृती कथा लेखक पुरस्कार, प्रा. देविदास खोडेवाड यांना डॉ. संतोष मुळावकर स्मृती शिक्षक लेखन पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सागर कुलकर्णी, प्रा.संतोष मोहिते संकलित “शब्दार्णव” (कविता संग्रह) अमर हबीब, दगडू लोमटे संकलित “नातीला पत्र”, “दशकधारा”, दगडू लोमटे लिखित काव्यसंग्रह “पांगलेल्या प्रार्थना”, संमेलनाध्यक्ष दासू वैद्य लिखित “चष्मेवाली”, “झुळझुळ झरा”, “गोलमगोल”, “क कवितेचा” या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. दासू वैद्य यांनी अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या गेल्या दहा वर्षांपासून चालू असलेला हा ज्ञानयज्ञ सतत चालू ठेवल्याबद्दल सर्व संयोजकांचे कौतुक करीत आजपर्यंत झालेल्या नऊ अध्यक्षांनी साहित्यात आपला वेगळेपणा जपत साहित्याचा ठसा उमटवला असल्याचे त्यांनी सांगितले.
दासू वैद्य यांनी माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, प्रा. शैला लोहिया, गणपत व्यास, प्राचार्य संतोष मुळावकर, डॉ. श्रीहरी नागरगोजे, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांच्या सोबत अंबाजोगाई मध्ये घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला. जन्मगाव हे जन्मावर ठरवायचं का कर्मावर ठरवायचं यांच्यावर तोडगा काढायचा ठरवला तर तो त्याच्या कर्मावर ठरवला गेला पाहिजे. माझा जन्म अंबाजोगाईत झाला नसला तरी अंबाजोगाई हे माझे कर्मगाव आहे आणि हे सांगताना मला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले. अंबाजोगाई येथील आपल्या महाविद्यालयीन शिक्षणात अनेक साहित्यीकांचा सहवास, त्यांना जवळून पाहण्याची, अभ्यासण्याची संधी मिळाली आणि आपण नकळत साहित्याकडे वळत गेलो. या सर्व जडणघडणीत अंबाजोगाई येथील साहित्य निकेतन या ग्रंथालयाचे फार मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांना केले, तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मसापचे सचिव कवी गोरख शेंद्रे यांनी मानले.