# शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस.

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. शरद पवारांकडून निवडणूक पत्राबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली.

देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्याबद्दल प्रेमाची भावना जी दिसत आहे त्याबद्दल आनंद आहे असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला.”नोटीस आधी मला आली, आता सुप्रियाला येणार आहे असं कळलं, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली. त्याचं उत्तर लवकरच मी देईन,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

कृषी विधेयकांवरील चर्चेदरम्यान गोंधळ घातल्याने निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. “राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी उपोषण सुरु केलं असून आपल्या मनातील भावना सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *