औरंगाबाद: राज्य शासनाने कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांनी आकारावयाचे दर निश्चित केलेले असून त्यानुसार कोरोना रुग्णांकडून जादा दराने आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मात्र, औरंगाबाद शहरातील 14 हॉस्पिटलने ६५६ कोरोना रुग्णांकडून 62 लाख 33 हजार इतकी जादा रक्कम आकारलेली आहे. त्याबाबत 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 14 हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस दिलेल्या आहेत. या नोटिसला सात दिवसांमध्ये हॉस्पिटलने समर्पक उत्तर न दिल्यास व बिल कमी करणेबाबत आवश्यक ती कारवाई न केल्यास कायद्यानुसार दंडाची अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.
या कारवाई अंतर्गत लाईफलाईन हॉस्पिटलला तीन लाख तीस हजार रुपये पंधरा रुग्णांचे परत करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांकडून आकारलेली अतिरिक्त रक्कम परत केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 21 मे 2020 व 31ऑगस्ट 2020 च्या अधिसूचनेनुसार राज्य शासनाने कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांनी आकारावयाचे दर याबाबत परिशिष्ट क नुसार दर निश्चित केलेले आहेत. यामध्ये दवाखान्यातील डॉक्टरची फीचाही समावेश आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांकडून जादा दराने आकारणी करू नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मात्र, औरंगाबाद शहरातील अनेक हॉस्पिटलमधून रुग्णांकडून जादा दराने बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या सर्व तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी सहायक लेखाधिकारी यांची हॉस्पिटलकडून आकारण्यात येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या बिलाची तपासणी करण्यासाठी नेमणूक केली. त्यानुसार सदर बिलांची सखोल तपासणी करण्यात येत असून तपासणीअंती औरंगाबाद शहरातील 14 हॉस्पिटलमध्ये 656 कोरोना रुग्णाचे बिलाची एकूण 62 लाख 33 हजार इतकी जादा रक्कम आकारणी केल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत सर्व नियुक्त सहायक लेखाधिकारी यांनी बिलातील जादा आकारणी बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला. त्यानुसार दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन 1949 व बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट 2006 मधील तरतुदीनुसार औरंगाबाद शहरातील 14 हॉस्पिटलला 62 लाख 33 हजार इतकी बिलाची जादा रक्कम आकारणी का केली म्हणून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.