औरंगाबाद: गणेश सोनार व शालिनी बिदरकर हे दोन्ही अधिकारी अनुभवी आहेत, त्यांनी आपले ज्ञान व अनुभवाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी करावा व भूमी अभिलेख या विभागाचे नाव उंचवावे, असे आवाहन भूमी अभिलेख मराठवाडा विभागाचे प्रभारी उपसंचालक तथा जिल्हा अधीक्षक अभय जोशी यांनी केले. ते मावळते औरंगाबादचे नगर भूमापन अधिकारी गणेश सोनार यांना निरोप व नव्याने रूजू होणाऱ्या शालिनी बिदरकर यांच्या स्वागतप्रसंगी बोलत होते.
यावेळी लातूरचे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव उपस्थित होते. औरंगाबाद नगर भूमापन अधिकारी या पदावर जमाबंदी आयुक्त आणि संचालक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक शालिनी बिदरकर यांची नगर भूमापन अधिकारी या पदावर बदली झाली आहे. त्यामुळे त्या बुधवारी या पदावर रूजू झाल्या आहेत त्यांचे स्वागत, तर येथून पंढरपूर येथे उपअधीक्षक पदावर गणेश सोनार यांची बदली झाली आहे, त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात अभय जोशी बोलत होते.
यावेळी परीरक्षण भूमापक अनिल रूपेकर यांनी स्वागतपर कविता सादर करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आरिफ शेख, म्हेत्रे, सुषमा पाटील, हेमंत औटी व सलीम शेख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रभारी उपसंचालक तथा जिल्हा अधीक्षक अभय जोशी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.