औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुक्रवारपासून (दि.नऊ) सुरु झाल्या. या परीक्षेत चार जिल्ह्यातून एक लाख ६४ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. चार जिल्ह्यातील ३३० केंद्रावर पहिल्या दिवशी सकाळच्या सत्राला एकूण १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा नोंदणी केली होती. त्यापैकी ७ हजार ८१० जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर दुपारच्या सत्रात ६ हजार ४८ जणांनी ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन हजार २१२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. आज दोन्ही सत्रात मिळून २२ हजार ७२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ हजार २२ जणांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे दिली, अशी माहिती उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली.
ऑनलाईन परीक्षा देताना अडचणी आलेल्या उर्वरित ११ हजार ५० पैकी बहुतांशी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा दिली. एकूण ३३० केंद्रावर ऑफलाईन परीक्षा दिलेल्यांची संख्या रविवारी उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन परीक्षा देतांना काही तांत्रिक अडचण आली तर त्या विद्यार्थ्यांना जवळच्या केंद्रात जाऊन ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली होती.
दरम्यान, ऑनलाइन परीक्षेत अडथळे कमी करण्यासाठी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यापीठाने आणखी २० आयटी कॉर्डिनेटरची संख्या वाढवली असून आज रात्रीच त्यांची ऑनलाईन बैठक घेऊन योग्य त्या सूचना देण्यात आले आहेत. तसेच संलग्न महाविद्यालयातील आयटी कॉर्डिनेटर यांनी ही विद्यार्थ्यांना सहकार्य, मार्गदर्शन करावे अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.