# बुद्ध पौर्णिमानिमित्त तीन दिवसीय ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेला सुरुवात; जगभरातून प्रतिसाद.

 

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवत असल्याने या वर्षी बुद्ध पौर्णिमा ऑनलाईन करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांनी तीन दिवसीय ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. या ऑनलाईन परिषदेत आठ देशातील वरिष्ठ बौद्ध भिक्खू आपले विचार मांडणार आहेत. आज मंगळवारी पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्राला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

आज सकाळी ७ वाजता जगप्रसिद्ध पंडित विश्व मोहन भट यांच्यासह भारतातील श्रेष्ठ कलावंतांनी भीमांजली कार्यक्रमात बाबासाहेबांना दिलेली आदरांजलीचे प्रक्षेपण करण्यात आले. ८:३० वाजता बालाघाट येथील विपश्यना सेंटरहून विनयरखिता महाथेरो यांनी ध्यानसाधना कशी करायची, हे शिकविले. त्यानंतर धम्मदेसनेत दान पारमितेचे महत्व सांगितले. त्यानंतर लोकूत्तरा भिक्खु ट्रेनींग सेंटरचे प्रमुख आदरणीय भदंत बोधिपालो महाथेरो हे तथागत बुद्धांच्या जीवनावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बुद्ध धम्मासाठी असलेले योगदान यावर विचार मांडले.

यावेळी भदंत बोधिपालो महाथेरो म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तवाहिन म्हणजेच रक्ताचा एकही थेंब या भारत भूमीवर न पडू देता एक महान अशी धार्मिक, सामाजिक आणि वैचारिक क्रांती केली. अनेक वर्षांपासून पीडित, दलित, हजारो वर्षांपासून गुलामीत असलेल्या पीडित लोकांना त्यांना मनुष्याचे जीवन जगण्यासाठी अत्यंत वैचारिक आणि वैज्ञानिक शिकवण देणारा बौद्ध धम्म मिळवून दिला. इतर कोणत्याही नेत्याला रक्तविहरीत क्रांती करता आली नसती म्हणून बाबासाहेबांची ही क्रांती भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदवली गेली. तसेच बाबासाहेबांनी स्वतः बौद्ध धम्म स्वीकारून आणि अंगीकारून मोठ्या हिमतीने भारतीय समाजाला बुद्धाची शिकवण दिली आहे. त्याचा प्रभाव असा झाला आहे की भारतामध्ये जी एकता, बंधुता, धार्मिक सहिष्णूता अखंडता आणि मानवता नांदत आहे. हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महान उपकार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून भारतीय समाजाला समान कायदा, समान स्वतंत्रता, समान अधिकार आणि समान सन्मान मिळवून दिला आहे. म्हणून बाबासाहेबांच्या कृपेमुळे आजचा हा भारत दिसतोय. भारताची स्वातंत्र्यता, अखंडता, बंधुत्व एकता राखण्यासाठी बुद्ध धम्माचा आधार घेऊन बुद्धाच्या विचाराने, प्रज्ञेने भारताची घटना लिहिली असे भदंत बोधिपालो महाथेरो म्हणाले.

आज दुपारी 4 वाजता “सद्य परिस्थितीतील उद्योग आणि व्यवसायाचे विश्लेषण” यावर बोलण्यासाठी डॉ. हर्षदीप कांबळे, (भा.प्र.से. ), सचिव (लघु व मध्य्म उद्योग) तथा विकास आयुक्त (उद्योग) आणि विनीत बनसोडे (बिझनेस कोच) लाईव्ह येणार आहेत. सायंकाळी 6 वाजता सारनाथ येथून धम्म लर्निंग सेंटरचे चंदीमा भन्ते धम्मदेसना देणार आहेत. चंदीमा भन्ते हे लहान वयातच भिक्खु झाले होते, त्यामुळे त्यांचा धम्मावर प्रचंड अभ्यास आहे.

याबरोबरच पुढील दोन दिवसात (६ ते ७ मे) जगभरातील नामवंत भिक्खूंची धम्मदेसना होणार आहे. बुधवारी सहा तारखेला मलेशियाचे महिंदा भिक्खु ऑस्ट्रेलियावरून लाईव्ह असणार आहेत. ते ध्यानसाधनेत मास्टर असून आपल्याशी धम्मदेसना आणि ध्यानसाधनेवर बोलणार आहेत. त्यांचे दुपारीसुद्धा धम्मदेसना ऑस्ट्रेलियावरून लाईव्ह प्रसारण होणार आहे. त्यानंतर श्रीलंकेचे भन्ते डॉ. पीयरताना ह्यांची धम्मदेसना ४ वाजता होणार आहे. सायंकाळी बंगलोर महाबोधी सोसायटीचे आनंद भन्ते यांची धम्मदेसना आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी (७मे) भदंत सदानंद महास्थवीर, भन्ते अजहन जयसारो (थायलंड), भन्ते डॉ खम्माई धम्मासामी (म्यानमार), भन्ते डॉ. अनिल शाक्य (थायलंड), भन्ते संघसेना (लडाख) आपल्याला धम्मदेसना देणार आहेत. ह्यासोबातच वेगवेगळ्या देशांच्या भिक्खुनी दिलेले संदेशसुद्धा वाचून दाखवले जाणार आहेत.

जागतिक धम्म परिषदेचे सर्व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी www.gbcindia2020.in या संकेस्थळाला भेट द्यावी. तसेच पुढील दोन दिवसात होणाऱ्या सर्व ऑनलाईन धम्मदेसना आणि कार्यक्रमांचा घरूनच लाभ घ्यावा. यासोबतच बुद्ध पौर्णिमेचा निमित्ताने गरजूंना अन्नदान करावे व कुशल कम्मात सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केली आहे.

One thought on “# बुद्ध पौर्णिमानिमित्त तीन दिवसीय ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेला सुरुवात; जगभरातून प्रतिसाद.

  1. आदर्श प्रस्थापित होईल या परिषदेद्वारे अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *