# दस्त नोंदणीची ऑनलाईन सुविधा.

पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाने नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने व दस्त नोंदणीच्या सोयीसाठी विभागात काही ऑनलाईन सेवा उपलब्ध केल्या आहेत. या सेवांचा नागरीकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने खालील सेवा सुविधांचा वापर करुन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरीकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता PDE व्दारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत,

नागरिकांनी ही PDE डेटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर eStep-in या प्रणालीव्दारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत आगाऊ वेळ आरक्षीत केली नसल्यास (walking) दस्त नोंदणी होणार नाही, याची नोंद घ्यावी.

नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वतःचे पेन आणावे, एकच पेन एकमेकांच्या सहयांसाठी वापरु नये, आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.

विभागाच्या वेबसाईटवर लिव्ह अँड लायसन ई -रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येत आहे.

सद्यस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठ्या शहरात उदा. मुंबई, ठाणे, पुणे व इतर ठिकाणी सकाळ, दुपार, दोन सत्रात कार्यालये सुरु आहेत. याऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेत सुरु राहिल. याशिवाय दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी सुरु असणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज शनिवार, रविवारी बंद करण्यात येत आहे. या कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरु राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *