हिंगोली: महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृती दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र, रेनबो संगणक प्रशिक्षण केंद्र आणि आंबेडकर प्रेस कौन्सिल, महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने १५ मे रोजी वामनदादा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन परिसंवादाला भरभरून प्रतिसाद मिळाला. या परिसंवादाला महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागातून तब्बल ८६० दर्शकांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदविली.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदनानिमित्त ‘वामनदादांच्या आठवणी’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात नाशिक येथील साहित्यिक व विचारवंत प्रा. गंगाधर आहिरे, औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील प्रा. संजय मोहड, सेवानिवृत्त अभियंता नारायण जाधव येळगावकर, औराद शहाजानी येथील दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील प्रा. अशोक नारनवरे, हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयातील प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले. यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु ई. वायुनंदन मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की वामनदादा यांच्या नावाने आमच्या विद्यापीठात अध्यासन केंद्र आहे. असे असतानाही आम्हाला यावेळी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर वामनदादा यांच्यावर कार्यक्रम घेता आला नाही. परंतु ही पोकळी रेनबो संगणक प्रशिक्षक संस्था आणि आंबेडकर प्रेस कौन्सिल यांनी भरून काढली. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमामुळे महाराष्ट्र आणि देशातील वामनदादा प्रेमींना खरोखरच एक अनोखी ऑनलाईन पर्वणी मिळाली असून वामनदादांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काव्यात्मक कार्याला उजाळा मिळाला आहे.
या परिसंवादात सहभागी होणारे सर्व वक्ते हे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नजीकचे संपर्कातील आहेत. त्यांनी वामनदादा यांच्या आठवणींना आणि त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला. हा परिसंवाद फेसबुकवरून लाईव्ह दाखविण्यात आले होते. महाराष्ट्र आणि देशातील तब्बल ८६० जणांनी या परिसवांदाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रा. विजयकुमार कांबळे यांनी मानले. तर कार्यक्रमासाठी कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, सहायक उपकुलसचिव डॉ. चंद्रकांत पवार, आंबेडकर प्रेस कौन्सिलचे प्रमुख रावण धाबे, नागेश अंभोरे, अंकुश देशमाने यांनी पुढाकार घेतला.