नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे ‘प्रभावी प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर’ (टेक्नॉलॉजी फॉर इफेक्टीव्ह अॅडमिनिस्ट्रेशन) या विषयावर चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मात्र ऐच्छिक आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे.
दि.११ ते १४ मे २०२० या दरम्यान ऑनलाईन आयोजित केलेल्या या प्रशिक्षणामध्ये विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होणे अनिवार्य करण्यात आले आहे. आणि संलग्नित महाविद्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे विद्यापीठ प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
दररोज सकाळी १० वाजता तपशिलवार माहिती कळविण्यात येणार आहे. सादरीकरण आणि व्हिडीओ प्रात्यक्षिके विद्यापीठ संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणासाठी निश्चित वेळ नाही, सहभागी त्यांच्या सोईस्कर वेळी सामग्री वाचू आणि पाहू शकणार आहे. ११ मे रोजी ‘गुगल फॉर्म’ या विषयावर डॉ.आर.एस.जैन आणि डॉ.सुरेन्द्रनाथ रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. १२ मे रोजी ‘एक्सेल मेलमर्ज’वर सिनियर प्रोग्रामर महेश कुलकर्णी तर १३ मे रोजी ‘ई-टपाल’ या विषयावर सिस्टीम एक्सपर्ट अजय दर्शनकार आणि शिवलिंग पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.१४ मे रोजी या प्रशिक्षणावर ऑनलाईन परीक्षा पार पडणार आहे.
‘टेक्नॉलॉजी फॉर इफेक्टीव्ह अॅडमिनिस्ट्रेशन’ या ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एल.एम. वाघमारे, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.भगवान जाधव, आंतरशाखीय विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ.वैजयंता पाटील आणि वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.वसंत भोसले यांच्या सल्ल्यानुसार करण्यात आले आहे. तर उपकुलसचिव डॉ.श्रीकांत अंधारे, सहा.कुलसचिव रामदास पेद्देवाड, सिस्टीम एक्सपर्ट अजय दर्शनकार, लीना कांबळे, सिनियर प्रोग्रामर महेश कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक दिगंबर उरे, अनिरुद्ध राहेगावकर आणि स्वीय सहायक लक्ष्मीकांत आगलावे हे ऑनलाईन प्रशिक्षणाच्या आयोजन समितीवर कार्यरत आहेत.