# राज्यात आता रेड आणि नॉनरेड असे दोनच झोन; नाॅन रेडमध्ये शासकीय कार्यालयात 100 टक्के उपस्थिती अनिवार्य; 22 मेपासून अंमलबजावणी

 

मुंबई: देशभरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. केंद्राच्या सूचनेनुसार अनेक राज्यांनी त्यांच्या कक्षेतही काही अधिक प्रमाणात शिथिलता दिली आहे. यावरून केंद्र सरकारने राज्यांना फटकारलेही होते. मात्र, महाराष्ट्राने अद्याप कोणतीही शिथिलता दिली नव्हती. आज लॉकडाऊन 4 बाबत नियम बदलण्यात आले आहेत.
दरम्यान, नाॅन रेड झोनमध्ये शासकीय कार्यालयात 100 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तर रेड झोनमध्ये 5 टक्के किमान 10 च्या मर्यादेत अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती आवश्यक आहे.

राज्यातील लॉकडाऊन संदर्भातली नियमावली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरविली आहे. ही नियमावली येत्या 22 मे पासून लागू होणार आहे. यानुसार महाराष्ट्रात आता दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही झोनमध्ये कन्टेन्मेंट झोन असणार आहे. राज्यात आता 22 मेपासून रेड आणि नॉनरेड असे दोनच झोन अस्तित्वात असणार आहेत. आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो सेवा, शिक्षण संस्था, हॉटेल, शॉपिंग मॉल बंद ठेवण्यात येणार आहेत.

तसेच कन्टेन्मेंट सोडून दोन्ही झोनमध्ये मद्य विक्री सुरु राहणार आहे. लग्न, राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात येणार आहेत. रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना संचारबंदी लागू असणार आहे. याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय गरजेशिवाय अन्य गोष्टींसाठी 65 पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेड झोनमध्ये काय काय?
मुंबई परिसरातील सर्व महापालिका, पुणे महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती रेड झोनमध्ये आहेत. तर राज्यातील उर्वरित भाग हा नॉन रेड झोनमध्ये येणार आहे. कटेन्मेंट झोनची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर देण्यात आली आहे. पालिका आणि जिल्हा प्रशासनाला यावर निर्णय घ्यायचा आहे. रेड झोनमध्ये रिक्षा, टॅक्सीला परवानगी नाही. चारचाकींना 1+2 परवानगी आहे. तर दुचाकीवर केवळ चालकालाच परवानगी आहे. हॉटेलना होम डिलिव्हरीची परवानगी नाही. मालवाहतूक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *