नांदेड: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
१. ‘भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’
२. ‘मुकनायक’ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक लेखन’
३. ‘भारतीय पत्रकारिता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’
या तीनपैकी कोणत्याही एक विषयावर विद्यार्थ्यांनी हस्तलिखित किंवा टंकलिखित निबंध (शब्दसंख्या किमान १५०० व कमाल २५०० एवढी असावी ) पोस्टाने पाठवावेत किंवा प्रत्यक्ष आणून द्यावेत. विद्यार्थ्यांनी निबंध स्वत: लिहिणे आवश्यक असून तसे पत्र सोबत पाठवावे.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख किंवा धनादेश स्वरुपात (प्रथम क्रमांक- रु. ३०००/-, द्वितीय क्रमांक – रु. २०००/-, तृतीय क्रमांक – रु. १०००/-, आणि उत्तेजनार्थ दोन – प्रत्येकी रु. ५००/- प्रमाणपत्रासह ) कुलगुरू यांच्याहस्ते विद्यापीठात एका विशेष समारंभात पारितोषिके देण्यात येतील.
इच्छुक स्पर्धकांनी महाविद्यालयाच्या ओळखपत्रासह आपले निबंध २२ जानेवारी २०२२ पूर्वी समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड -४३१६०६’ या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले आहे.