रोटरी क्लबच्या पुढाकाराने संगीताच्या माध्यमातून कोविड रूग्णांना मानसिक आधार
अंबाजोगाई: कोविड केअर सेंटर मधील अलगीकरण कक्षातील रूग्णांची मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि मानसिक आधार देऊन चैतन्य निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब आॅफ अंबाजोगाई सिटी, तालुका आरोग्य यंत्रणा आणि निषाद म्युझिक सिस्टीमचे संचालक प्रसिद्ध गायक तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आॅक्सीगान या संगीत रजनीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अंबाजोगाईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सोमवार, ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता आॅक्सीगान या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब आॅफ अंबाजोगाई सिटी, तालुका आरोग्य यंत्रणा आणि निषाद म्युझिक सिस्टीम यांच्या वतीने अशा प्रकारे आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम आहे.
आॅक्सीगान या संगीत रजनीच्या सुरुवातीला या कोविड केअर सेंटरमध्ये कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी लोमटे, डॉ.प्रदीप दामा, डॉ.सय्यद इम्रानअली, डॉ.अंजली नागरगोजे, डॉ.शरद गीते यांच्यासोबत वैद्यकीय आणि इतर कर्मचा-यांचा सत्कार रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे, सदस्य रोटरीचे जगदीश जाजू, संतोष मोहीते व इतरांनी केला.
प्रारंभी आॅक्सीगान संगीत रजनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका रोटरीचे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी सांगितली. या कार्यक्रमात निषाद म्युझिक सिस्टीमचे संचालक प्रख्यात गायक तालमार्तंड प्रकाश बोरगावकर, अंबाजोगाई खाजगी डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले, प्रा.प्रमोद माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदी मराठीतील विविध गीते गाऊन कोविड रुग्णांची संगीत सेवा करत कोविड विरुध्दचा लढा सशक्तपणे लढण्याचा संदेश दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षातील कोविड रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आॅक्सीगान या संगीत रजनीस कोविड रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला.