# श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास 50 लोकांच्या उपस्थितीत परवानगी.

 

पुणे: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास श्री क्षेत्र देहू येथून शुक्रवार, 12 जून व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास श्री क्षेत्र आळंदी येथून शनिवार, 13 जून 2020 रोजी पालखी प्रस्थान सोहळ्यास मंदिर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत उपरोक्त निर्देशांचे पालन करुन परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम २(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या अनुषंगाने श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू (ता.हवेली,जि.पुणे) व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी (ता.खेड जि.पुणे) येथून पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान करीत असतात. तरी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू येथून 12 जून व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथून 13 जून रोजीच्या प्रस्थान सोहळ्यास या दोन दिवसांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू व आळंदी यांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व निर्देशाप्रमाणे नियमावलीचे पालन करुन राखून तसेच पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करुन दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थान मंदिर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आदेशान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *