‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवात दिग्गजांची सुरेल गायनसेवा, नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट
पुणे: ‘पं. भीमसेन जोशी यांचे गायन अजरामर आहे. शास्त्रीय गायन, अभंग अशा अनेक माध्यमातून त्यांनी संगीत सेवा केली. या संगीत यज्ञातून पंडीतजींच्या स्मृती जपून त्यांना आपण अभिवादन केले, ही चांगली गोष्ट आहे. हा ‘खयाल यज्ञ ‘महोत्सव रसिकांच्या हुदयात कोरला जाईल. पं. भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे. महोत्सवात सहभागी कलाकारांचे मी अभिनंदन करतो’, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सकाळी केले.
‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दिग्गज कलाकारांनी सुरेल गायन सेवा केली. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी साडेनऊ वाजता सदिच्छा भेट दिली. भाषणातून शुभेच्छा दिल्या, आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेतला. पुनीत बालन यांनी नितीन गडकरी यांचा सत्कार केला.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘भारतीय
शास्त्रीय संगीतात फार मोठी शक्ती आहे. ते सर्वांना आवडते, पण त्याचे सादरीकरण, प्रेझेंटेशन आपण चांगल्या रितीने केले पाहिजे. संगीताच्या चांगल्या आराधनेला रसिकांचा प्रतिसाद मिळतो, पण, सरकार, पालिकांनी सभागृहे उपलब्ध करून दिली पाहिजे.
यावेळी पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. विजय घाटे, सौ. कांचन गडकरी, सौ. गिरीजा बापट, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, पुनीत बालन,आ. सिध्दार्थ शिरोळे, मेधा कुलकर्णी, गणेश बीडकर, श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे, गोविंद बेडेकर, मंजुषा पाटील, चितळे उपस्थित होते. डॉ.विनिता आपटे, राहुल सोलापुरकर यांनी सूत्रसंचालन केले. पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित हा महोत्सव १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू आहे.
पंडित भीमसेन जोशी यांनी ख्याल गायकीला मानाचे स्थान मिळवून दिल्याने तसेच पंडितजींची कारकीर्द पुण्यात घडल्यामुळे १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
१३ फेब्रुवारी रोजी अश्विनी भिडे -देशपांडे, पंडित डॉ राम देशपांडे, पं जयतीर्थ मेवुंडी, सावनी शेंडे-साठे, संदीप रानडे, सौरभ नाईक, ओंकार दादरकर, पंडित रितेश आणि पंडित रजनीश मिश्रा, पद्मा तळवलकर इत्यादी मान्यवर गायकांनी सुरेल सादरीकरण केले.
१४ फेब्रुवारी रोजी आरती अंकलीकर -टिकेकर, कलापिनी कोमकली, राहुल देशपांडे, निषाद बाक्रे, देवकी पंडित, विनय रामदासन, गौतम काळे, रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील, पंडित राजन मिश्रा, पंडित साजन मिश्र इत्यादी मान्यवर गायनसेवा करणार आहेत.
दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार महोत्सवाला भेट देणार आहेत, तर दु. ४:३० वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची उपस्थिती व्हिडीओ संदेशा द्वारे असणार आहे. १४ रोजी सायंकाळी साडेचार वाजता विधान परिषद उप सभापती डॉ नीलम गो-हे या महोत्सवाला भेट देणार आहेत.
पद्मभूषण पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्या उपस्थिती मध्ये “खयाल यज्ञाचा” समारोप व वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती ‘संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष गोविंद बेडेकर आणि सचिव सौ. मंजुषा पाटील यांनी दिली. मिलिंद कुलकर्णी,राहुल सोलापूरकर , आनंद देशमुख,डॉ विनिता आपटे हे निवेदक या महोत्सवाचे निवेदन करीत आहेत.