# देश एकसंध ठेवण्यासाठी पं.भीमसेन जोशी यांचे सुरांच्या माध्यमातून योगदान.

‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवात दिग्गजांची सुरेल गायनसेवा, शरद पवार यांची सदिच्छा भेट

पुणे: ‘पंडित भीमसेन जोशी यांनी देश एकसंध ठेवण्यासाठी, प्रादेशिक आणि सामाजिक ऐक्य राखण्यासाठी सुरांच्या माध्यमातून महत्वाची भूमिका बजावली, त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा तीन दिवसांचा संगित महोत्सव उपक्रम पुणेकर रसिकांसाठी अभूतपूर्व संधी आहे,  पुण्याची सांस्कृतिक उंची वाढविण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग होईल’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी सकाळी काढले.

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी दिग्गज कलाकारांनी सुरेल गायन सेवा केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सकाळी साडेनऊ वाजता सदिच्छा भेट दिली. भाषणातून शुभेच्छा दिल्या.पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समिती चे अध्यक्ष खा.गिरीश बापट यांनी शरद पवार, खा.श्रीनिवास पाटील यांचा सत्कार केला. महोत्सवाला मदत केल्याबद्दल  श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे, पुनीत बालन यांचा सत्कार शरद पवार यांनी केला.डॉ. विनीता आपटे यांनी सूत्रसंचालन केले. खा. गिरीश बापट यांनी आभार मानले.

गोविंद बेडेकर, मंजुषा पाटील, शौनक अभिषेकी, संजय चितळे, डॉ. राजेंद्र शेंडे, हेमंत अभ्यंकर उपस्थित होते.

शरद पवार  पुढे म्हणाले, ‘खयाल गायकी हे पंडितजींचे वैशिष्ट्य होते. आपल्याला अनेकांना भीमसेन जोशी यांचे सूर ऐकायला मिळाले, ते आपण कधी विसरू शकत नाही. काणे बुवा प्रतिष्ठानने या जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. पुण्याची सांस्कृतिक उंची वाढविण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग होईल.

देशात महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नासारखे अनेक प्रश्न असताना त्याचा परिणाम होऊ न देता देश एकसंघ ठेवण्यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी योगदान दिले, असेही त्यांनी सांगितले.

१४ फेब्रुवारी रोजी आरती अंकलीकर -टिकेकर, कलापिनी कोमकली, राहुल देशपांडे, निषाद बाक्रे, देवकी पंडित, विनय रामदासन, गौतम काळे, रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील, पंडित राजन मिश्रा, पंडित साजन मिश्रा इत्यादी मान्यवरांनी बहारदार गायनसेवा केली.

सायंकाळी ४:३०  वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर  यांनी व्हिडीओ संदेशा द्वारे महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

१४ रोजी सायंकाळी साडेचार वाजता  विधान परिषद उप सभापती डॉ नीलम गो-हे या महोत्सवाला भेट देणार आहेत.

पद्मभूषण पं. राजन आणि पं. साजन  मिश्रा यांच्या उपस्थिती मध्ये “खयाल यज्ञाचा” समारोप व वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती  ‘संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष गोविंद बेडेकर आणि सचिव सौ.मंजुषा पाटील यांनी दिली.

मिलिंद कुलकर्णी, राहुल सोलापूरकर, आनंद देशमुख, डॉ विनिता आपटे या निवेदकांनी या महोत्सवाचे निवेदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *