परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिराच्या विश्वस्तांनाही आले धमकीचे पत्र
अंबाजोगाई: मी एक मोठा गुंड असून तुम्ही आजवर जमा केलेल्या लाखोंच्या देणगीमधील ५० लाख रुपये मी दिलेल्या पत्त्यावर पाठवा अन्यथा योगेश्वरी देवीचे मंदिर आरडीएक्स ने उडवून देऊ असे धमकीचे पत्र योगेश्वरी देवल कमिटीच्या नावाने टपालाद्वारे आल्याने अंबाजोगाई परिसरात खळबळ उडाली आहे .
नुकत्याच १२ ज्योतिर्लिंगांपैकी १ ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मिळाल्याने परळी शहरात अशीच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच अंबाजोगाई येथेही असेच धमकीचे पत्र आले आहे. शुक्रवार,२६ नोव्हेंबर रोजी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त यांच्या नावाने धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर अंबाजोगाई येथेही काल योगेश्वरी देवल कमिटीला मुख्य विश्वस्तांच्या नावाने धमकीचे पत्र आले आहे.
‘आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन ‘, अशी धमकी असलेले पत्र अंबाजोगाईच्या देवल कमेटीस शनिवारी रात्री प्राप्त झाले आहे.
दरम्यान, असे पत्र महाराष्ट्रात अनेक मंदिराना पाठविले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला हे पत्र प्राप्त होताच देवल कमिटी चे सचिव अँड.शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणीही लोमटे यांनी केली आहे. याप्रकरणी शहर ठाण्यात आरोपी प्रभाकर नामदेव पुंड (रा.पिंपळगाव, जि.नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली.