बीड: बीड जिल्ह्यात निघालेल्या शांतता रॅलीला सर्व स्तरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली असून नागरिकांनी दिवाळीची खरेदी बिनदिक्कतपणे करावी, असे आवाहनही त्यांनी केले. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत शांतता रॅलीचे आयोजन आज करण्यात आले.
या रॅलीमध्ये शहरातील सर्वच स्तरातील नागरिक सहभागी होऊन जिल्ह्यात शांतता राखावी यासाठी कटिबद्धता दर्शविली. या रॅलीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांचे आभार मानले. जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आली होती. ती कमी करून आता जमाव बंदीचे आदेश काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. पुढच्या काही दिवसात दिवाळीचा सण असून या निमित्ताने बाजारात खरेदी करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. त्यांनी बिनदिक्कतपणे खरेदी करावी, जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून संदेश जारी केला.