# लष्करात महिला अधिकाऱ्यांच्या स्थायी कमिशन नियुक्तीला परवानगी.

नवी दिल्ली: भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांची  स्थायी  कमिशनवर नियुक्ती करण्यास केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीनुसार, अशा नियुक्तीसाठी पात्र महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी, लष्करी मुख्यालयाने कार्यवाही सुरु केली आहे. या निवड प्रक्रियेसाठी विशेष क्रमांक 5 निवड मंडळ स्थापन करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून सर्व महिला अधिकाऱ्यांना, या निवड मंडळाकडे सादर करण्याच्या आवेदनपत्राची सूचनावली पाठवण्यात आली आहे.

महिला विशेष प्रवेश योजना तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून भारतीय लष्करात भरती झालेल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना या पदासाठी संधी दिली जाणार असून त्या सर्वांनी येत्या 31 ऑगस्ट 2020 पर्यंत आपली आवेदनपत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रे लष्कराच्या मुख्यालयात पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्जाचा विहित नमुना आणि इतर कागदपत्रांची सूची देखील लष्कराने जारी केलेल्या सूचनावलीत अंतर्भूत करण्यात आली आहे.

कोविड-19 मुळे लागू असलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर, विविध माध्यमातून ही सूचनावाली जारी करण्यात आली आहे, जेणेकरुन ही कागदपत्रे  या पदासाठी इच्छुक असलेल्या सर्व महिला अधिकाऱ्यांपर्यंत प्राधान्याने  पोहचतील. आवेदनपत्र मिळाल्यावर त्यांची छाननी आणि पडताळणी झाल्यावर लगेचच पुढच्या प्रक्रियेसाठी, निवड मंडळाची बैठक होईल, अशी माहिती भारतीय लष्कराचे जनसंपर्क अधिकारी कर्नल अमन आनंद यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *