नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त हौशी व व्यावसायीक छायाचित्रकारांसाठी खुल्या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नांदेडसह परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्हातील सुमारे ७१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून या सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुलात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, विजय होकर्णे, नयन बाराहाते, डॉ.केशव सखाराम देशमुख, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक, डॉ.पी. विठ्ठल, जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम इ. उपस्थित होते.
“विद्यापीठ परिसरातील दृश्य” हा विषय स्पर्धकांना देण्यात आला होता. विद्यापीठाच्या या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून या छायाचित्र स्पर्धेतून विद्यापीठ परिसराचे कलात्मक आणि सचित्र दर्शन घडविण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी केला आहे. भविष्यात ही स्पर्धा अधिक व्यापक स्थरावर घेण्यात येईल, असे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सांगितले.
विजेता स्पर्धकांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील. असे छायाचित्र स्पर्धेचे संयोजक डॉ. पी.विठ्ठल आणि डॉ. अशोक कदम यांनी जाहीर केले आहे.