हिंगोली: हिंगोली पोलीस दलातील जमादार जितेंद्र साळी (वय४३) यांनी स्वतः जवळील बंदुकीने गोळी झाडून आज दुपारी आत्महत्या केली. ही घटना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शस्त्रगार विभागात घडली.
हिंगोली पोलिस दलातील कर्मचारी जितेंद्र साळी हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील शस्त्रगार विभागात कार्यरत होते. शनिवार, 20 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ते शस्त्रगार विभागात होते. याच ठिकाणी त्यांची नियुक्ती होती. परंतु दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्याकडील बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या कशामुळे केली याची माहिती घेण्यात येत आहे. परंतु पोलिस दलात यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस मुख्यालयातील आरमोरर विभागात (शस्त्र दुरुस्ती) जितेंद्र साळी (४३) हे कर्मचारी मागील काही दिवसांपासून कार्यरत होते. आज दुपारच्या सुमारास ते विभागात कामासाठी आले होते. त्यानंतर दुपारी त्यांनी कार्यालयातच एसएलआर रायफलने हनुुवटीच्या खालच्या भागातून गोळी मारून आत्महत्या केली. मुख्यालयातून गोळी उडाल्याचा मोठा आवाज आल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचांर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी साळी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा चेहऱ्याचा भाग छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले.
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपाधीक्षक रामेश्वर वैंजने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
जितेंद्र साळी हे मुळचे कळमनुरी येथील रहिवासी आहेत. सन २००१ मध्ये हिंगोली पोलीस दलात भरती झाले होते. त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात काम केले आहे. त्यानंतर त्यांची अरमोरर विभागात बदली झाली होती. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर आत्महत्येचे नेमके कारण समजू शकणार आहे.