पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड रूग्णालयात सुरू होणार पोस्ट कोविड सेंटर
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात लवकरच पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना पुन्हा काही त्रास होत असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन हजाराहून अधिक रूग्ण कोविड मुक्त झाले आहेत. त्यातच या रूग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू केल्यामुळे रूग्णांची सोय झाली आहे. आता कोविड मुक्त झालेल्या रूग्णांना पुन्हा त्रास होऊ लागल्यास संबंधित नागरिकांना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले तर त्यांचा पुन्हा त्रास वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन रूग्णालयात स्वतंत्र पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
याबाबत रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर गायकवाड म्हणाले,“एखादा रूग्ण कोविड मधून मुक्त झाली तरी त्याला काही महिने त्रास होतो. यामध्ये दम लागणे, अंग दुखणे, मानसिकदृष्ट्या खचणे, मन विचलित होणे, हदयाचा त्रास, शुगर, बीपी वाढणे यासह विविध प्रकारचे विकार होत असतात. त्यामुळे संबंधित रूग्ण जास्त त्रासतो ही बाब लक्षात घेऊन पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी रूग्णालयाचा काही भाग वापरण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये फिजिओथेरपीस्ट, समुपदेशक, सायकलॉजिस्ट, फिजिशियन यासह इतर विषयात निष्णात असलेलेल्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. काही डॉक्टर रूग्णालयात कार्यरत आहेत. त्यामुळे बरेचसे काम सोपे होणार आहे. पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या समितीपुढे चर्चेसाठी मांडण्यात येणार आहे, असेही डाॅ.गायकवाड म्हणाले.