# केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या काही परीक्षा, मुलाखतींना स्थगिती.

नवी दिल्ली: वेगाने बदलत जाणारी परिस्थिती, आरोग्यविषयक मुद्यांचा विचार, सामाजिक अंतरासह टाळेबंदीमुळे येत असलेले निर्बंध,  तसेच वाढत जाणाऱ्या महामारीमुळे लादली जाणारी परिस्थिती  या सर्व बाबीं लक्षात घेऊन सध्याच्या काळात परीक्षा आणि मुलाखती यांचे आयोजन करणे शक्य होणार नाही, असा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतला आहे.

दिनांक 09 मे 2021 रोजी होणारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EO/AO) भरती चाचणी 2020 त्यामुळे स्थगित करण्यात आली आहे. भारतीय अर्थसेवा/ भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2020 (जी दिनांक 20 ते 23 एप्रिल 2021रोजी आयोजित केली होती) या सेवांसाठी होणारी  व्यक्तिमत्त्व चाचणी, नागरी सेवा परीक्षा (जी 26 एप्रिल ते 18 जून 2021या दरम्यान आयोजित केली होती) आणि भरती प्रक्रिया (चाचणी) देखील पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

ज्या परीक्षांसाठी देशातील सर्व भागांतील उमेदवार आणि सल्लागार यांना प्रवास करावा लागतो, अशा सर्व मुलाखती आणि भरती चाचण्यांसाठी वेळोवेळी परिस्थितीचे पुनरावलोकन करण्यात येईल. या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यूपीएससीच्या संकेतस्थळावर सूचित केले जाईल.

परीक्षा, भरती प्रक्रिया आणि मुलाखती या संदर्भातील आयोगाचे सर्व निर्णय तातडीने  संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील.

स्थगित करण्यात आलेल्या सर्व चाचण्या/मुलाखती याबाबतचा तपशील तारखा निश्चित झाल्यावर उमेदवारांना किमान15 दिवस आधी कळवण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *