मुंबई: मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत. तसेच त्यांनी ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे.
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या आहेत.
रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या आहेत. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तत्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तत्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाल्याचे वृत्त आहे. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला आहे. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरु आहे.