पुणे: महापारेषण कंपनीच्या लोणीकंद व चाकण या दोन अतिउच्च दाबाच्या ४०० केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३० च्या सुमारास पाच ठिकाणी ट्रिपींग आले होते. या तांत्रिक बिघाडामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच चाकण, वाघोली, लोणीकंद आदी ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यातील ८० टक्के भागात सकाळी ८.३० ते १२ वाजेपर्यंत व ऊर्वरित २० टक्के भागात दुपारी ३.१५ वाजेपर्यंत वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास महापारेषणच्या लोणीकंद ते चाकण आणि चाकण ते तळेगाव या दोन्ही टॉवर लाईनच्या एकूण ५ सर्कीटमध्ये घटदाट धुकं व दवं यांचा परिणाम झाल्याने तांत्रिक बिघाड झाला. परिणामी महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या ४०० केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. या उपकेंद्रांतून महावितरणच्या तब्बल १८९ उपकेंद्रांना होणार वीजपुरवठा देखील ठप्प झाला. त्यामुळे पुणे शहरातील सुमारे १५ लाख १३ हजार, पिंपरी चिंचवड शहरातील ७ लाख २५ हजार तसेच लोणीकंद, वाघोली, चाकण या ग्रामीण परिसरातील सुमारे १ लाख ८० हजार अशा एकूण २४ लाख १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
दरम्यान वीजपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर महावितरण व महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपात्कालीन नियोजन केले. यामध्ये कोयनेमधील वीजनिर्मिती वाढविण्यात आली व त्याचा महापारेषणच्या जेजूरी ४०० केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात आला. जेजूरी उपकेंद्रातून महावितरणच्या विविध उपकेंद्रांना पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध झाल्यानंतर सकाळी ८.३० पासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास महावितरणकडून तांत्रिक उपाययोजना करण्यास वेगाने सुरवात झाली. यामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण परिसराच्या ८० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्वप्रथम रुग्णालये, पाणीपुरवठा योजना, घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तसेच महापारेषणच्या युद्धपातळीवरील दुरूस्ती कामामुळे टॉवर लाईनच्या पाच पैकी दोन सर्कीटच्या दुरूस्तीचे काम दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण झाले. त्यामुळे या दोन्ही सर्कीटवरून महावितरणच्या काही उपकेंद्रांना वीजपुरवठा सुरू झाला व उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास आणखी वेग देण्यात आला.
पुणे शहर अंतर्गत रास्तापेठ, बंडगार्डन, पर्वती, कोथरूड, नगररोड, शिवाजीनगर विभागामध्ये पर्यायी व्यवस्थेतून सकाळी ११.३० वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरु करण्यात आला तर पद्मावती विभागामध्ये १ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला. पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत पिंपरी विभागामध्ये १२ वाजेपर्यंत संपूर्ण भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला. भोसरी विभागामध्ये सकाळी १०.१५ वाजेपर्यंत एमआयडीसी व घरगुती ग्राहकांसह सुमारे ५५ टक्के भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला तर उर्वरित ४५ टक्के भागात दुपारी ३.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. यासोबतच ग्रामीण भागामध्ये लोणीकंद व वाघोली परिसरातील वीजपुरवठा सकाळी ९.४५ च्या सुमारास सुरळीत करण्यात आला. तर महत्वाच्या चाकण एमआयडीसीमधील वीजपुरवठा देखील दुपारी १२.१५ वाजता सुरु करण्यात आला.
असा होतो ग्राहकांना वीजपुरवठा: वीजनिर्मिती कंपन्यांकडून निर्माण केलेली वीज ही महापारेषण कंपनीच्या अति उच्चदाबाच्या टॉवर लाइनद्वारे त्याच कंपनीच्या ४०० केव्ही, २२० केव्ही व १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांपर्यंत आणली जाते. या अतिउच्चदाब उपकेंद्रांमधून महावितरण कंपनीच्या ३३ केव्ही, २२ केव्ही व ११ केव्ही उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जातो व या उपकेंद्रांमधून निघणाऱ्या वीजवाहिन्या व रोहित्रांद्वारे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, शेती आदी सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.