मुंबई: अश्विनी म्हात्रे- सत्ता कायम कुणाचीही नसते.. कधी कोण, सत्तेत येईल आणि त्याला महत्व येईल आणि कधी कुणाची सत्तेची कवचकुंडलं गळून पडतील आणि अत्यंत सामान्यपणे व्यवहार करावा लागेल- हे सांगू शकत नाही.. गेल्या सरकारमधील सर्वशक्तिमान व्यक्तीला मंत्रालयामध्ये मुक्तपणे फिरताना पाहिल्यावर हेच म्हणावे वाटेल.. प्रवीण परदेशी.. फडणवीस सरकार अक्षरशः ज्यांनी चालवले ते वरिष्ठ अधिकारी.. मुख्यमंत्र्यांचे सचिव.. सगळं प्रशासन ज्यांनी एकहाती चालवलं ते अधिकारी.. मंत्रालयात हातात पिशवी घेऊन सामान्यपणे फिरताना पाहिल्यावर खरोखरच सामान्य जनतेला भलतेच आश्चर्य वाटले..
फडणवीस सरकार जाऊन ठाकरे सरकार आल्यावर नाराज झालेले परदेशी, सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेवेत आहेत. खरं तर ठाकरे सरकारने त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचे खास अधिकारी म्हणून काही अन्याय केला नव्हता. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईचे काय होणार, अजस्त्र शहराचा कोरोना कसा आटोक्यात येणार असा प्रचंड ताण असताना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जवाबदारी त्यांना देण्यात आली पण कोरोना आटोक्यात न आल्याने सरकारने त्यांना तडकाफडकी बदलले. पण नगरविकास खात्याच्या सचिवपदी नियुक्ती दिली. हे खातेही महत्वाचे मानले जाते. पण फडणवीस सरकारमधे अत्यंत महत्व मिळालेले परदेशी नाराज झाले आणि त्यांनी तत्पूर्वी संयुक्त राष्ट्रसंघात सेवा देण्यासाठी केलेल्या अर्जावर आलेल्या प्रतिसादाला होकार दिला. एकेकाळी मंत्री, आमदार आणि मुख्य सचिवापेक्षाही पॉवरफुल असलेल्या परदेशी यांना म्हणूनच मंत्रालयात असे पाहुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.. अनेकांना त्यांच्या साधेपणाचे कौतूकही वाटले आणि अनेकांना
बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आठवला, आपलं करियर उतरणीला लागल्यावर ते आपल्या मनाची खंत या शब्दात बोलून दाखवत की-
..कल था मै जहा-
आज कोई और है..
वो भी एक दौर था,
ये भी एक दौर है..!