माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे आवाहन; अंबाजोगाईत धम्म महोत्सवातून प्रवर्तनवादी विचारांचा जागर
अंबाजोगाई: तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासा असे आवाहन धम्म महोत्सवातून माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. अंबाजोगाईत आयोजित धम्म महोत्सवातून पहिल्याच वर्षी प्रवर्तनवादी विचारांचा जागर झाला.
अंबाजोगाईत शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी चार सत्रांमध्ये नियोजित ‘विश्वशांती महाविहार’, ‘लुंबिनी पार्क’, मांडवा रोड, काळवटी तांडा-२,अंबाजोगाई येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पहिल्या सत्राचे उद्घाटन माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे हस्ते करण्यात आले. धम्म महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे होते. तर विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बहुजन विकास मोर्चाचे प्रमुख बाबुराव पोटभरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार दयानंद गायकवाड, दिलीप भालेराव, डॉ.अमरेंद्र विद्यागर, मोहन माने, एॅड.अनंतराव जगतकर, प्रा. एस.के. जोगदंड, एस.के. चेले, प्राचार्य डॉ.जयपाल कांबळे, प्रा.प्रदीप रोडे, प्रा.संजय जाधव, डॉ.प्रशांत दहिरे, अरविंद विद्यागर, डॉ.मधुकर कांबळे, डी.एस.विद्यागर, शशिकांत बनसोडे, नगरसेवक महादेव आदमाने, पंचायत समिती सदस्य श्रीहरी मोरे (माजलगाव), एन.के. कांबळे, डॉ.शेरखान, उद्योजक कैलास शिंदे, पंकज तरकसे, भालचंद्र लोखंडे, दयानंद कांबळे, संभाजीराजे पवार, एॅड.शिंदे, कुमार कुर्ताडकर, विनोद शिंदे, धनंजय शिंगाडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण, प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. धम्म महोत्सव संयोजन समितीने मान्यवरांचे स्वागत केले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करताना प्रा. डी.जी. धाकडे म्हणाले की, आधार सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तनासोबत सामाजिक बांधिलकीतून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याकरीता या ठिकाणी बुद्ध विहार, विपश्यना केंद्र बांधून या भूमीचे नंदनवन करण्याचा आमचा संकल्प आहे. तर उद्घाटन म्हणून बोलताना राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, समाजातील मोजक्या लोकांनी एकत्र येऊन आयोजित केलेला धम्म महोत्सव हा उपक्रम कौतुकास्पद आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हजारो वर्षे गुलामीच्या जोखडात असणारा आपला समाज बाहेर काढला, त्याला स्वाभिमान दिला. आज आपण सर्व बहुजन समाजाला सोबत घेवून सामाजिक, राजकीय व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य केले पाहीजे. आपले मित्र कोण हे ओळखून त्यांच्यासोबत गेले पाहीजे, आंबेडकरी समाजाचे ऐक्य झाल्यावर महाराष्ट्रात आपण कोणाची सत्ता आणायची हे ठरवू शकतो.आपण एकसंघ राहिल्यास समाजाचा फायदा होतो. मला मिळालेल्या मंत्रीपदाच्या संधीचा उपयोग मी सर्व बहुजन, आंबेडकरी आणि वंचित समाजासाठी केला, विद्यार्थी, महिला यांच्या हिताचे निर्णय घेतले, अनेकांना उद्योजक होण्यास मदत केली. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मागासवर्गीय समाजासाठी मोठी आर्थिक तरतूद करून घेतली, प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन, वसतिगृहे बांधली. बुद्ध विहारांना निधी दिला. भूमिहीनांना १९ हजार एकर जमीन दिली. बेघरांना माता रमाई आंबेडकर आवास योजनेमधून घरकुले दिली. कोणत्याही पक्षासोबत रहा पण, त्या ठिकाणी राहून समाज हिताचे काम करा, अंबाजोगाईतील आधार सामाजिक प्रतिष्ठानला सर्वोतोपरी मदत व सहकार्य करणार असल्याचे मंत्री हंडोरे यांनी यावेळेस सांगितले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, या धम्म महोत्सवातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याचे धम्म कार्य व्हावे याकरीता आपण एक लाख एक हजार रूपये देणार असल्याचे देशमुख यांनी जाहीर केले. तर कुमार कुर्ताडकर यांनी नियोजित बांधकामासाठी ५० पोते सिमेंट देणार असे सांगितले. राजकिशोर मोदींकडून देखिल मदतीचे आश्वासन देण्यात आले. बाबुराव पोटभरे यांनी अंबाजोगाईत धम्म चळवळ गतिमान व्हावी, आंबेडकरी विचार उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या शक्तींसोबत राहू नका, गोरगरीब माणसांचा आधार व्हा अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी धम्म महोत्सव आयोजन, विपश्यना केंद्रासाठी जागा खरेदी, तसेच यापुढे दरवर्षी केवळ दहा उपासकांच्या योगदानातून अशोक विजयादशमी दिवशी म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून “धम्म महोत्सव” घेण्याचे बौध्द उपासकांनी सर्वानूमते ठरवले आहे असे सांगून भविष्यातील आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील वाटचालीबद्दल भाष्य केले. सर्वांना सोबत घेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नितीमान समाज निर्मिती व भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करू तसेच आम्ही समविचारी मित्रांना सोबत घेवून पुढे जावू अशी अपेक्षा प्राचार्य डॉ.कांबळे यांनी व्यक्त केली.