सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११९ वा पदवी प्रदान समारंभ
पुणे: पुणे ही शिक्षणाची पंढरी असून ही ओळख आणखी ठळकपणे जगासमोर आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि बारामती येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे मुंबई येथील महावाणिज्यदूत पिटर ट्रसवेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीला चालना मिळणार आहे. यशदाच्या माध्यमातून प्राध्यापकांना आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. पुणे येथे मुक्त विद्यापीठाचे विभागीय कार्यालय असून लवकरच बारामती येथे उपकेंद्र सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि त्यांना त्यासाठी आवश्यक संधी मिळावी असे शासनाचे प्रयत्न आहेत.
गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे. अधिकाधिक मुलांना या योजनेचा लाभ होण्यासाठी प्रत्येक विद्यापीठातून या योजनेचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज असल्याचे मतही श्री.सामंत यांनी व्यक्त केले.
पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले विद्यापीठाला जगात अग्रेसर ठेवण्याचे कार्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केले आहे. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने विद्यापीठाची स्थापना झाली. आज विद्यापीठाने देशाच्या सीमा ओलांडल्या असून कतारसारख्या देशातही विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू करणे ही गौरवास्पद बाब आहे. पुण्याचा ऐतिहासिक वारसा चित्ररूपाने पुणेकरांसमोर यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीवर चर्चा होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अहवाल सादर करताना विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पदवी प्रदान समारंभात सन ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० या वर्षात व त्यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ३ हजार ८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यापैकी ४३ स्नातकांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.