# पुणे विभाग; 1202 मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व लाईव्ह वेबकास्टिंग.

पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक; विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा

पुणे: भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदान प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व पारदर्शी वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाने पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यातील सर्वच 1202 मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात त्यादृष्टिने वेबकास्टिंग कक्ष उभारण्यात आला असून या कक्षामध्ये मतदान केंद्रावरील कामकाज पाहता येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासोबतच पाचही जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयातही वेबकास्टिंग कक्ष उभारण्यात आला असून या कक्षातून पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही मतदान केंद्रावरील कामकाज पाहू शकणार आहेत.

पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे संपूर्ण लाईव्ह वेबकास्टिंग, सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. 1202 मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज या कक्षास भेट देऊन पाहणी करून पाचही जिल्ह्यातील मतदान केंद्रावरील तयारीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात उभारण्यात आलेल्या या वेबकास्टिंग कक्षाचे समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी कामकाज पाहत आहेत. तसेच विभागीय गोदाम निरीक्षक संतोष सर्डे या कक्षासाठी कार्यरत आहेत.

शिक्षक मतदार संघासाठी 367 व पदवीधर मतदार संघासाठी 835 मतदान केंद्र आहेत. या सर्वच मतदान केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *