# न सांगितलेली गोष्ट हे मनातलं मोठं ओझं असतं, हे ओझं हलकं करण्यासाठी लिहिलं पाहिजे -क्षितिज पटवर्धन.

 

पुणे:  पत्रकार एकाच वेळी अनेक गोष्टी जगत असतात. पत्रकारांकडे शोधक दृष्टिकोण असतो त्यामुळे पत्रकार चांगला लेखक होऊ शकतो. शिवाय आपल्या मनात न सांगितलेली गोष्ट हे मोठं ओझं असतं, हे ओझं हलकं करण्यासाठी लिहित राहिलं पाहिजे, असं मत पत्रकारितेतून चित्रपटांच्या कथालेखनाकडे वळलेले क्षितिज पटवर्धन यांनी आज रविवारी येथे व्यक्त केलं.

निमित्त होतं पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि रानडे इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अॉनलाईन कार्यशाळेत स्क्रिप्ट रायटींग या विषयावरी तिसऱ्या सत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांचा चित्रपटाच्या कथालेखनाच्या प्रवासाचे चित्र उलगडून दाखवले. याबरोबरच चित्रपटासाठी कथा कशी आकारास येते, ती कोणत्या व कशा फॉर्मेटमध्ये लिहावी. गीत लेखन कसे  करावे, चित्रपटाच्या कथेसाठी व गीतलेखनासाठी किती मानधन मिळते, याबद्दलची सविस्तर माहिती दिली.

सिनेमाची कथा लिहिणे म्हणजे कुकरला भात लावण्यासारखे असते, असे सांगून ते म्हणाले की, एखादी कथा लिहायची असेल तर ती सुरूवातीला चार पानांत व चार भागांत लिहावी,  नंतर तिचा विस्तार करून 16 पानांत लिहावी. हे सांगत असताना त्यांनी गाजलेल्या शोले चित्रपटाचे उदाहरण दिले. चित्रपटातील संवाद (डॉयलॉग) हा चित्रपटाचा आत्मा असतो, असे सांगताना त्यांनी संवाद लेखनाचे कौशल्यही उलगडून दाखवले.

चित्रपट हे एक  सशक्त  माध्यम आहे, असं सांगताना ते म्हणाले की,  चित्रपटाला कुठलाही विषय वर्ज नसतो. नायक हा खरं सांगणारा असतो, तसाच तो खरं शोधणाराही असतो, हे सांगताना त्यांनी लिहिलेल्या फास्टर फेणे, या चित्रपटाचे उदाहरण सांगितले.

आजूबाजूला घडणाऱ्या घटना, माणसांमधून तुम्हाला कथाविषय मिळू शकतात यासाठी शोधक  दृष्टी पाहिजे, अशी दृष्टी पत्रकारांकडे असते, म्हणून पत्रकार हा चांगला लेखक होऊ शकतो. चित्रपट लेखनाच्या मानधनाविषयी ते म्हणाले की,  मराठी चित्रपटाची कथा लिहिल्यास त्यासाठी 4 लाख रूपये मिळतात. हेच हिंदी चित्रपटासाठी लिहिल्यास 9 लाख रूपये मिळतात. मराठी चित्रपटातील गितासाठी किमान 25 हजार तर हिंदीत लिहिल्यास मराठीत मिळणाऱ्या मानधनाच्या किमान आठपट पैसे मिळू शकतात.

चित्रपट लेखनासाठी आपण लिहिलेलं लेखन हे स्क्रिप्ट रायटींग असोसिएशन (एसडब्ल्यूए) या संस्थेकडे रजिस्टर्ड करावे, ज्यामुळे लेखकाची फसवणूक होणार नाही.  याबरोबरच तुमची कथा देताना करार करावा, असा करार करताना निसंकोचपणे करावा, अशा अनेक बारीक-सारीक गोष्टी क्षितिज पटवर्धन यांनी यावेळी उलगडून दाखवल्या.  याबरोबरच सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांच्या अर्थाजनासाठी काय करावे, याबाबतही पटवर्धन यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

या आनलाईन कार्यशाळेसाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, योगेश बोराटे यांच्यासह उज्ज्वला बर्वे आदिंनी पुढाकार घेतला. यापूर्वी झालेल्या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात 5 जून रोजी डॉ. त्रिवेणी गोस्वामी-माथूर व 6 जून रोजी दुसऱ्या सत्रात आदिती जठार-लकडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *