जालना: जालन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणूची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रविवार, ५ जुलै २०२० रोजी रात्री १२ वाजेपासून ते बुधवार, १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जालना नगर परिषद हद्दीत संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जालन्यात मद्य प्रेमींनी आता दहा दिवस मद्य मिळणार नसल्यामुळे रविवारी मद्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
सध्या आषाढ महिना सुरू असल्यामुळे मद्य प्रेमींनी दहा दिवसांचा स्टाॅक (बेगमी) करून ठेवण्यासाठी रांगा लावून मोठ्या प्रमाणात मद्य खरेदी केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या एकूण 722 कोरोना पॉझिटिव्ह आहेत. 401 रूग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज दिला आहे, तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व प्रसार माध्यमे, सर्व शासकीय कार्यालये व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये, बँका (केवळ अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी ) वॉटर सप्लाय, गॅस वितरक, विद्युत सेवा, मोबाईल व दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, शासकीय कापूस व मका खरेदी केंद्र, औद्योगिक वसाहतीतील कारखाने इत्यादी यांचे कर्मचारी व त्यांची वाहने यांना या संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे. दूध विक्रेत्यांना गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये जाऊन सकाळी ७ ते ९ या कालावधीत विक्री करता येणार आहे.