नवी दिल्ली: किंमतीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली राफेल जेट फायटर ही विमाने अखेर भारतात दाखल होत आहेत. भारतीय हवाई दलाच्या पाच राफेल विमानांची पहिली तुकडी जुलै 2020च्या अखेरीला भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. 29 जुलै रोजी अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर हवामानाच्या स्थितीनुसार या तुकडीचा हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या विमानांच्या खरेदी किंमतीवरून काँग्रेस व राहुल गांधी यांनी सातत्याने केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
हवाई दलाच्या ताफ्यात या विमानांचा समावेश करण्याचा मुख्य सोहळा ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात 20 तारखेला होणार आहे. या विमानाचे भारतीय हवाई दलाच्या हवाई उड्डाण कर्मचाऱ्यांना आणि जमिनीवरील कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये या विमानातील अत्याधुनिक शस्त्र प्रणालीच्या हाताळणीचाही समावेश असून त्यांच्या परिचालनासाठी आता ते पूर्णपणे सज्ज आहेत. या विमानांच्या आगमनानंतर लवकरात लवकर या विमानांच्या परिचालनावर भर देण्यात येणार आहे.