पुणे: गेल्या 24 तासात विदर्भातील काही ठिकाणी तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. दरम्यान, पुणे शहर व आसपासच्या परिसरातील काही भागात दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात शुक्रवार, 19 फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान सर्वत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ व लगतच्या भागावरील चक्रीय चक्रवात आता दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर आहे. उत्तर कर्नाटक ते विदर्भावर असलेला चक्रीय चक्रवातापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा आता उत्तर केरळ किनारपट्टी-कर्नाटक -दक्षिण मध्य महाराष्ट्रावर आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मराठवाड्याच्या काही भागात किंचीत वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे:
मुंबई (कुलाबा) 21.5, सांताक्रुझ 20.4, रत्नागिरी 21.7, पणजी (गोवा) 22.0, डहाणू 21.0, पुणे 16.7, जळगाव 16.5, कोल्हापूर 18.5, महाबळेश्वर 14.1, मालेगाव 17.8, नाशिक 16.0, सांगली 16.3, सातारा 18.4, सोलापूर 20.6, औरंगाबाद 17.0, परभणी 18.5, नांदेड 17.0, अकोला 17.6, अमरावती 16.6, बुलढाणा 17.8, ब्रम्हपुरी 17.6, चंद्रपूर 16.6, गोंदीया 15.0, नागपूर 16.6, वाशिम 16.2, वर्धा 17.5.