पुणे: बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याची कोणतीही अनुकूल स्थिती नाही. त्यामुळे राज्यातील पावसात खंड पडला आहे. ही स्थिती २८ जून पर्यंत राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
बुधवार, २४ जूनपासून राज्यात पाऊस चार दिवस विश्रांती घेत आहे. कोकणासह राज्यात बहुतांश जिल्ह्यात २८ जूनपर्यंत उघडीप राहील. फक्त विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस राहील. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड भागात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, महाराष्ट्रत २३ जूनपासून खंड पाडला आहे. पुढचे चारही दिवस म्हणजे २४ जून ते २८ जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेत आहे. कोकणसह मुंबई, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.२८ जूनपासून पुन्हा पाऊस गती घेईल पण तो मध्यम स्वरूपाचा राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.