# औरंगाबादसह जिल्ह्यात पाऊस; मराठवाड्यातील काही भागात मुसळधारेचा अंदाज.

औरंगाबाद: औरंगाबादसह मराठवाड्यात विविध भागात चांगला पाऊस सुरू झाला आहे. १९ जुलैपासून पुष्य नक्षत्राचे हत्तीवरून आगमन झाले. गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत शहराला झोडपून काढले. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत रात्री ८.३० वाजेपर्यंत ४१.० मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवार, २१ जुलैपासून श्रावण प्रारंभ झाला. पहिल्या दिवसापासूनच श्रावणसरी कोसळत असून, कोरोना काळातही सुखद वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पाऊस सुरू आहे. गुरुवारी, २३ जुलै रोजी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलका, मध्यम आणि दमदार पाऊस झाला आहे. हा पाऊस खरिपाच्या पिकांसाठी योग्य वेळी पडल्यामुळे उपयुक्त मानला जात आहे. शुक्रवार, २४ जुलै रोजी देखील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असून, मराठवाड्यातील औरंगाबादसह जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही सर्वदूर समाधानकारक पाऊस कोसळत आहे. आणखी दोन-तीन दिवस जिल्ह्यासह बहुतांश ठिकाणी मध्यम आणि तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *