# राजू शेट्टीच होणार आमदार; विधान परिषद उमेदवारीवर शिक्कामोर्तब.

 

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेली यादवीची परिस्थिती टाळत अखेर राजू शेट्टी यांच्या विधानपरिषद आमदारकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. संघटनेतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्यांची नाराजी दूर करण्यात आली. त्यामुळे शेट्टी यांच्या नावावर सर्वांनी सहमती दर्शवली आहे.

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी ऑफर करण्यात आली आहे. संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत ऑफर स्वीकारली. मात्र, स्वाभिमानीतील काही प्रमुख नेत्यांनी याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शेट्टी यांनी उद्विग्न होत आमदारकीची ब्याद नको म्हणत समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत संघटनेत सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवल जात आहे.

संघटनेतील प्रमुख पदाधिकारी नेत्यांची बैठक पार पडली यावेळी, स्वतः माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या विधान परिषद उमेदवारीने नाराज असलेले जालिंदर पाटील, सावकर मादनाईक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. कळत न कळत आमच्यामध्ये जे गैरसमज निर्माण झाले ते सर्व संपले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ होती व नेहमीच एकसंघ राहिल. आम्ही सर्वजण शेतकरी हिताशी बांधील आहोत. आमच्यामध्ये आता कसेलेही मतभेद उरले नाहीत. सर्वजण एकदिलाने, एकजुटीने व एकमताने चळवळीचे काम करू, अशी भावना बैठकीनंतर व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *