औरंगाबाद: रमजान महिन्याचे तीस रोजे पूर्ण झाले आहेत, त्यानंतर रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना चाँद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. हिलाल कमिटी इमारत ए शरिया मराठवाडा यांनी चंद्रदर्शन झाल्याचे जाहीर करत सोमवारी सोशल डिस्टंन्सिंगसह ईद घरीच नमाज अदा करून ईद साजरी करण्याचे आवाहन केेले. त्यामुळे सोमवारी (दि.२५) मुस्लिम बांधव घरातच ईद उल फित्रची नमाज अदा करणार आहेत.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत हिलाल कमिटी व इमारत ए शरियाच्या पदाधिकाऱ्यांंची बैठक झाली, परंतु चंद्रदर्शन न झाल्याने सोमवारी रमजान ईद साजरी करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, रविवारी चंंद्र दर्शनानंतर सोमवारी ईद साजरी करण्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे सोमवारी २५ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून दुपारी ११.३० या वेळेत मुस्लिम बांधव घरामध्ये ईदची नमाज अदा करणार आहेत.
दरवर्षी मुस्लिम बांधव शहरातील तीन इदगाह, जामा मस्जिदसह शहरातील विविध भागातील मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यासाठी गर्दी करत होते. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता, व लॉकडाऊनचे पालन करत मुस्लिम बांधव ईदची नमाज घरीच अदा करणार आहेत. महिनाभर सर्व इबादत घरातच केली त्यामुळे ईदची नमाज घरीच अदा करा असे आवाहन उलेमांनी केले आहे.