औरंगाबाद: पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये असलेली बंडखोरी स्पष्टपणे समोर आली असून, माजी खासदार आणि भाजपा नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
गायकवाड यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. मी भाजपाच्या प्रदेश कार्यसमिती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकृत करावा, असे गायकवाड यांनी पाटील यांना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
भाजपकडून पदवीधर निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने गायकवाड नाराज होते, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. भाजपा नेते शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, किशोर शितोळे, जयसिंगराव गायकवाड हे नेते आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे बोराळकर यांना उमेदवारी देण्याची घोषणा भाजपाने केली आहे.
तर दुसरीकडे घुगे आणि गायकवाड यांनी सुद्धा पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपची चिंता वाढली होती. परंतु प्रवीण घुगे यांची समज काढण्यात भाजपला यश आले होते. मात्र, जयसिंगराव गायकवाड यांची नाराजी भाजपला दूर करता आली नाही.