महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगालमधील 37, मध्यप्रदेशातील 34, आसाममधील 32, ओडिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.
यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की नवीन भारत हा विकसित भारताच्या उद्दिष्टाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या अमृत काळाची सुरुवात आहे. “यामागे नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा आणि नवीन संकल्प” असल्याचं अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की भारतीय रेल्वेच्या इतिहासात ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. देशातील जवळजवळ 1300 महत्त्वपूर्ण स्थानकांचा आता आधुनिकीकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास केला जात असून या अमृत भारत स्थानकांना आता नवसंजीवनी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितलं. एकूण 1300 स्थानकांपैकी अंदाजित 25000 कोटी रुपये खर्चाच्या 508 अमृत भारत स्थानकांची कोनशीला आज बसवण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. देशात रेल्वे तसंच सामान्य नागरिकांच्या बरोबरीनं होत असलेला हा पुनर्विकास प्रकल्प म्हणजे एक भव्य मोहीम असेल यावर त्यांनी भर दिला. याचे लाभ देशातल्या सर्व राज्यांपर्यंत पोहोचतील हे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात सुमारे 4000 कोटी रुपये खर्चाच्या 55 अमृत स्थानकांचा, मध्य प्रदेशात सुमारे 1000 कोटी रुपये खर्चाच्या 34 स्थानकांचा, महाराष्ट्रात 1,500 कोटी रुपये खर्चाच्या 44 स्थानकांचा आणि इतर राज्यांमधल्या स्थानकांसह तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळातल्या महत्त्वाच्या स्थानकांचा विकास या अंतर्गत केला जाणार आहे. यावेळी रेल्वे मंत्रालयाची प्रशंसा करत पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रकल्पाबद्दल नागरिकांचं अभिनंदन केलं आहे.