# अमफन चक्रीवादळाची तीव्रता कमी; विदर्भासह उत्तर भारतात उष्णतेची लाट!.

 

पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या आणि जोरदारपणे पूर्व किनारपट्टीकडे झेपावलेल्या अमफन चक्रीवादळाची तीव्रता पूर्णपणे कमी झाली आहे. दरम्यान, विदर्भासह उत्तर भारतामधील काही राज्यांमध्ये कोरड्या हवामानामुळे उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात अमफन या चक्रीवादळाचा वेग तासी 180 ते अगदी 275 कि.मी. एवढा होता. हे चक्रीवादळ वेगाने पश्चिम बंगाल, बांग्लादेश, ते पुढे  ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत सरकले होते. सध्या हे चक्रीवादळ कोलकात्यापासून 270 कि.मी. उत्तरपूर्व, रंगपूर (बांग्लादेश) पासून 150 कि.मी. दक्षिण पश्चिम आणि आसाममधील धुबरीपासून 110 कि.मी. अंतरावर दक्षिण भागात असून, या चक्रीवादळाचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. तसेच या चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. पुढील दोन दिवसात कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता सुध्दा कमी होणार आहे. असे असले तरी वादळाच्या प्रभावामुळे आसाम, अरूणाचल प्रदेश, हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, सिक्कीम, या राज्यांध्ये आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे.

विदर्भासह उत्तर भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट:  अमफन या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे कोरडे वातावरण तयार झाले आहे . परिणामी आता पुन्हा  21 ते 25 मे दरम्यान उष्णतेची लाट येणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ,  पश्चिम मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पॉंडेचरी या राज्यामध्ये ही उष्णतेची लाट राहणार आहे. तसेच या भागात वादळीवारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *