# नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता उपनिबंधक, आरटीओ कार्यालय सोमवारपासून सुरु.

 

संग्रहित छायाचित्र

नांदेड: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कटेन्मेंट झोन) वगळता उपनिबंधक कार्यालय, प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय नमूद अटीवर सोमवार, 18 मे पासून चालू ठेवण्याची परवानगी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

या अटीमध्ये उपनिबंधक कार्यालय ही पाच कर्मचारी संख्येवर चालू राहतील. प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय 10 टक्के कर्मचारी संख्या बळावर चालू राहतील. या नमूद सूचना व्यतिरिक्त अंमलात आणवयाच्या काही बाबी असल्यास त्याकरीता या विभागास स्वतंत्ररित्या अपर मुख्य सचिव (वित्त), अपर मुख्य सचिव (महसूल), अपर मुख्य सचिव (परिवहन) यांचे अधिनस्त समितीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल व अशी परवानगी जिल्हादंडाधिकारी कार्यालयास अवगत करणे बंधनकारक असेल. या आदेशाची अंमलबजावणी सोमवार, 18 मे पासून राहील.

या कार्यालयाच्या / आस्थापनाच्या ठिकाणी पुढील उपाययोजना बंधनकारक असतील. कार्यालयाच्या ठिकाणी प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे. एकावेळेस कार्यालयात 5 पेक्षा जास्त अभ्यागतांना प्रवेश राहणार नाही. कार्यालयातील कर्मचारी व अभ्यागत यांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे. मानवी संपर्कातील येणाऱ्या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमित निर्जंतुकीकरण करावे.  या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असे आदेश आज जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *