# फडणवीसांची बुलेटप्रूफ गाडी काढली; चंद्रकांत पाटलांची सुरक्षा हटवली.

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षाव्यवस्था महाविकास आघाडी सरकारने कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना दिलेले बुलेटप्रूफ वाहन आता काढून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही कपात करण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना सध्या झेड दर्जाची सुरक्षा आहे. त्यात कपात करून ती आता वाय प्लस दर्जाची करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रसाद लाड यांना तर आता विशेष सुरक्षा नसेल. देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी हिटलिस्टमध्ये टाकले असल्याची चर्चा आहे. या संबंधात त्यांच्या निकटवर्तीयांची काळजी घेतली जात होती. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात  त्यांच्या भोवतीचे सुरक्षा कवच अभेद्य करण्यात आले होते. मुख्यमंत्रीपदाच्या काळात शहरी नक्षलवादाबद्दलचे काही निर्णय हे त्यांच्यासाठी आयुष्यभराचे आव्हान ठरल्याचे मानले जाते. मात्र, काल रात्री उशीरा अचानक त्यांना देण्यात आलेले पायलट वाहन आणि बुलेटप्नुफ गाडी काढून  देण्यात आली. नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जात असतो. महाविकास आघाडी सरकारमधील उच्चपदस्थांच्या बैठकीत दोन दिवसांपूर्वी यासंबंधीचा आढावा घेण्यात येणार होता. त्या बैठकीनंतर हे घडले काय याबद्दल उत्सुकता आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे, अस्लम शेख अशा काही मंत्र्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाला सामोरे जाणारे प्रसाद लाड, काँग्रेसमधून बाहेर पडलेले पण अद्याप भाजपमध्ये न प्रवेशलेले कृपाशंकरसिंह यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *