# धनंजय मुंडेंविरुद्ध रेणू शर्मा ने केलेली तक्रार मागे.

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे.  धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत या महिलेने खळबळ उडवून दिली होती.

कौटुंबिक कारणास्तव मी केस मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी याबाबत रेणू शर्मा यांच्याकडून शपथपत्र घेतले आहे. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वरील बालंट टळले असून पोलिसांनी ही चौकशी थांबवली आहे.  दरम्यान, असे असले तरी रेणू शर्मा हिच्या विरोधात भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे व मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनी, खोटे आरोप करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.  त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आरोप होताच भाजपने धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, मुंडेंनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत, रेणू शर्मा यांच्या विरुद्ध ब्लॅकमेलिंग चा आरोप केला होता. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन सत्य बाहेर येउ द्या, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती.

दरम्यान, गेल्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांनी सबंध महाराष्ट ढवळून निघाला होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी अगदी आरोप झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जनता दरबार घेतला. दरम्यानच्या काळात लोकांच्या भेटीगाठी, दैनंदिन कामकाज, बीड जिल्ह्यातील कामकाज आदी उपक्रम त्यांनी नियमित सुरू ठेवले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र, सुरुवातीपासून सावध भूमिका घेत, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची गरज नसून, या प्रकरणात काय ती चौकशी होऊन सत्य बाहेर येऊद्या अशी भूमिका घेतली होती. अखेर सत्य बाहेर आले असून, रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतल्याने आता मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. तर रेणू शर्मा ने अर्ध्यात माघार घेतल्याने त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनीही ही केस सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी या प्रकरणी सत्यता पडतळल्याशिवाय निष्कर्षाला येणे योग्य नाही. या प्रकरणात चौकशी करून खोलात जाण्याची गरज आहे, अशी भूमिका घेतली होती. रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यानंतर खा. पवार यांनी आपण घेतलेली भूमिका योग्यच होती असा पुनररुच्चार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *