हडपसरच्या शंभर वर्षे जुन्या वडाचे साताऱ्यात पुनर्रोपण

‘सह्याद्री देवराई’ करणार वडासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा

पुणे: सुमारे शंभर वर्षे वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई ‘ संस्थेला यश आले आहे ! वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून  सोमवार,१४ फेब्रुवारी रोजी, दुपारी ४ ते ६ या वेळेत म्हसवे (डी मार्ट जवळ, ता. सातारा) येथे या वटवृक्षा सोबत अनोखा ‘व्हलेंटाईन डे ‘ साजरा करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अभिनेते आणि सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, ‘ अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान, म्हसवे येथे नेवून पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे. व्हलेंटाईन डे ला आम्ही सर्व वृक्षप्रेमी नागरिक, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षा भोवती जमून त्याचे कोडकौतुक करणार आहोत.

शंभर वर्षाचं झाड पुनरुज्जीवन करायला फक्त २५ हजार खर्च आला. अडचण होते, म्हणून  ही झाडं काढून टाकून देता कामा नये. हा तर राष्ट्रीय वृक्ष आहे, त्याचे सन्मानाने २६ जानेवारी रोजी म्हसवे (सातारा) येथे पुनर्रोपण करण्यात आले. निवडणुकीत जिंकला तरी एखाद्याची आपण मिरवणूक काढतो, इथे तर शंभर वर्षाचा राष्ट्रीय वृक्ष वाचला आहे. म्हणून त्याच्या पालवी सोबत गाणी गायली जाणार आहेत, नृत्य केले जाणार आहे, असे सयाजी शिंदे यांनी सांगीतले.

संस्थेचे विश्वस्त धनंजय शेडबाळे म्हणाले, ‘वडासारख्या मोठ्या झाडांना वाचवता येते, जीवदान देता येते, हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आम्ही व्हॅलेंटाईन डे दिवशी करतो आहोत.’

पानसरे नर्सरी (श्रीगोंदा) चे संचालक बाळासाहेब पानसरे यांनी या वटवृक्षाच्या पुनर्रोपणाच्या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन केले. १४ फेबुवारी रोजी या कार्यक्रमात पुनर्रोपणाच्या तंत्राची माहिती देणार आहेत.

सह्याद्री देवराई’ च्या पुढाकारातून दुर्मिळ झाडांचे उद्यान: आतापर्यंत साधारण 22 देवराई , 1 वृक्ष बँक, 14 गड किल्ले या सोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान 4 लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेनं वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे.

साताऱ्यातही अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून  दुर्मिळ झाडांचे उद्यान तयार केले जात आहे. उद्यानात ते मेहनत घेताना अनेकदा दिसून येतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील पश्चिम घाटामध्ये असणाऱ्या दुर्मिळ वनस्पती आणि वृक्ष त्याच बरोबर देशातील इतर राज्यातील 600 च्या वर असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग साताऱ्यात सुरू करण्यात आला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गालगत साताऱ्यातील म्हसवे गावाच्या बाजूला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महामार्गाजवळील पोलीस गोळीबार मैदानाच्या तब्बल 30 एकर जागेत सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांच्यावतीने हे अनोखे उद्यान उभारण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *