मुंबई: रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
काय आहे प्रकरणः अन्वय नाईक हे कॉन्कॉर्ड डिझाइन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक होते. ही कंपनी आर्किटेक्चर आणि इंटेरिअर डिझाइनचे काम करते. अर्णब गोस्वामी यांनी कॉन्कॉर्ड कंपनीकडून रिपब्लिकन टीव्हीच्या आर्किटेक्चर आणि इंटेरिअर डिझाइनचे काम करून घेतले. परंतु अर्णब यांनी ८३ लाख रुपये दिलेच नाहीत. त्यामुळे वडिल आणि आजीला आत्महत्या करावी लागली, असा आज्ञा नाईक यांचा आरोप आहे. अलिबाग पोलिसांनी या दृष्टिकोनातून तपासच केला नसल्याचाही आज्ञा नाईक यांचा आरोप आहे.
अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरिअर डिझाइनचे काम केले होते. हे काम ५ कोटी ४० लाख रुपयांचे होते. परंतु वारंवार पाठपुरावा करूनही अर्णब यांनी नाईकांना त्यांचे पैसे दिले नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांच्या तक्रारीवरून अलिबाग पोलिसांनी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हाही नोंदवला होता. परंतु तेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्यामुळे अर्णब यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नव्हती.