औरंगाबाद: लोकसहभागातून परिस्थिती यशस्वीपणे हाताळता येते हे मालेगाव आणि औरंगाबाद येथे मोठ्या संख्येने बाधितांचे प्रमाण होते त्याठिकाणी पहायला मिळत आहे. लोकांच्या सहकार्यातून आज मालेगाव कोरोनामुक्तीच्या जवळ पोहचलेले आहे. त्या पद्धतीने औरंगाबादमध्येही सुधारणा होत आहे. पूर्ण तयारीनिशी आरोग्य सुविधा सज्ज ठेवाव्यात. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्राधान्याने काम करावे, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालक मंत्री सुभाष देसाई, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, खा. इम्तीयाज जलील, खा. भागवत कराड, आमदार अंबादास दानवे, आ. हरिभाऊ बागडे, आ.अतुल सावे, आ.प्रदीप जैस्वाल, आ. प्रा. रमेश बोरनारे, आ.संजय शिरसाठ, आ. प्रशांत बंब, आ. उदयसिंग राजपूत,
जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके आदी उपस्थित होते.
खा. पवार म्हणाले, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी शासन निर्देशानुसार यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असून मृत्यूदर रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यासाठी उपचार सुविधांमध्ये वाढ करत असताना जिल्ह्याला कोरोनामुक्त करून जनजीवन सुरळीत करण्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. राज्यात कोरोना संकटाचा यशस्वी सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा, अधिकारी, लोकप्रतिनिधी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये लोकांनी स्वयंशिस्त पाळून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीन योग्य ती खबरदारी घेण्याला विशेष महत्व आहे. लोकांच्या सक्रीय सहभागातूनच कोरोनाचे संकट आपण यशस्वीरित्या परतवू शकतो. लोकांनी घरात सण साजरे करून चांगले उदाहरण उभे केले आहे. याच पद्धतीने यंत्रणांच्या प्रयत्नांना जनतेने कृतीशील पाठिंबा देत स्वयंशिस्तीचे पालन केले तर लवकरच आपण या कोरोनाच्या संकटातून यशस्वीपणे बाहेर पडू, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.
तसेच राज्य शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उत्तमरित्या या संकटाच्या स्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. त्यामध्ये राज्य शासनाला येणाऱ्या अडचणी, आवश्यक निधी याबाबत केंद्र सरकारकडे माहिती देण्यासाठी कोरोना रूग्णांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांना आपण भेट देत असून लोकप्रतिनिधीसोबत तसेच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेत अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. महाराष्ट्राने नेहमी संकटाच्या काळात प्रशासकीय यंत्रणेच्या सोबतीने उत्तम काम करून दाखवलेले आहे. या कोरोना संकटात आरोग्य, महसूल, पोलीस इतर सर्व संबंधित यंत्रणा चांगले काम करत आहे. जिल्ह्यात त्यांच्या प्रयत्नांतून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पवार यांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये पालकमंत्र्यांच्या सूचनांमूळे उद्योग क्षेत्र या संकटकाळातही सुरू राहिले, ही चांगली बाब असून कारखानदारी पूर्ववत चांगली सुरू होईल, त्यासाठी कामगारांचा विश्वास वाढण्याच्या दृष्टीनेही काम केले पाहिजे. पालकमंत्री जिल्ह्याच्या उपचार सुविधा सक्षम करण्यासाठी राज्यस्तरावर सतत पाठपुरावा करत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांवून ही लढाई यशस्वी करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी यावेळी केले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणा अविश्रांतपणे मेहनत घेत आहे. त्यामुळे मृत्यूदर आणि बाधितांचा दर आटोक्यात आणावयाचा आहे. यासाठी मिशन मोडवर काम होणे गरजेचे असून यामध्ये जनजागृती महत्वाची आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जागरूक करणे आणि लोकसहभाग वाढवणे यादृष्टीने यंत्रणांनी काम करावे. असे निर्देशित करून श्री. टोपे म्हणाले, राज्य शासन आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्याने प्रक्रिया राबवत असून घाटीसह मनपाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व रिक्त पदांवर नियमित भरती करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉईज, टेक्नीशियन ही पदे भरण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा मनपा, प्रशासन सर्वजण रात्रंदिवस काम करत चांगल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेत. त्यामध्ये दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लोकसहभागातून यशस्वी झाला. त्यात चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने बाधितांना वेळीच शोधून काढणे, संसर्ग रोखणेही गतिमानतेने सुरू आहे. आपल्याला मृत्यूदर शुन्यावर आणण्याचे आव्हान आहे, त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी आणि सर्व यंत्रणांनी जनसहभागातून अधिक व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सादरीकीकरणाव्दारे माहिती दिली.
बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस महानिरिक्षक डॉ. रवींद्र सिंगल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकरी अधिकरी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे सीईओ डॉ. सुधाकर शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, महापालिका वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर, डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, उपसंचालक डॉ. एस.व्ही लाळे, सहायक संचालक डॉ. जी.एम. गायकवाड, नोडल अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. गणेश कल्याणकर, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एन. बारडकर, उपाध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास प. गांडाळ आदी उपस्थित होते.