औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील जवान ॠषीकेश अशोक बोचरे युनिट 119 असॉल्ट इंजिनियर रेजिमेंट यांना चीनच्या सीमेवर कर्तव्यावर असताना 12 मे रोजी सकाळी 11:50 वाजता वीरमरण आले. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने गुरूवारी सायंकाळी पाच वाजता चिकलठाणा विमानतळ येथे आणण्यात आले आणि तिथून त्यांच्या मूळगावी देवगाव रंगारी येथे नेण्यात आले. तेथील बाजारपेठ परिसरात रात्री शासकीय इतमामात शहीद बोचरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पोलिस तसेच सैन्यदलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत शोकाकुल वातावरणात गावकऱ्यांनी, उपस्थितांनी शहीद बोचरे यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी शहीद जवान ॠषीकेश बोचरे यांचे आई वडील, पत्नी, मोठे बंधू , नातेवाईक यांच्यासह कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सरपंच श्रीमती सोनवणे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) गणेश गावडे, संदीप गावित, पोलिस उपअधीक्षक (गंगापूर), सैन्य अधिकारी कॅप्टन पिनाकी पांडा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत, तहसीलदार संजय वरकड, सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिर, ग्रामविकास अधिकारी डॉ.वेनीकर यांच्यासह संबंधित अधिकारी, गावकरी उपस्थित होते.
दरम्यान, शहीद जवान ॠषीकेश बोचरे यांच्या स्मरणार्थ देवगाव रंगारी बाजारपेठेस शहीद बोचरे यांचे नाव देण्यात येणार असल्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी यावेळी जाहीर केले.